सवर्साधारण फसवणूक

🔹फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप :

सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफाइल, हॅकिंग लिंक्स आणि लाभाच्या आमिषा द्वारे लोकांची फसवणूक करतात. ते तुमची वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा आर्थिक माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करतात.

🔹बनावट मित्र / सेलिब्रिटी प्रोफाइल :

ओळखीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून पैसे मागणे किंवा वैयक्तिक माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करतात.

उदाहरणार्थ आयएएस/ आयपीएस / आर्मी अधिकारी असे प्रोफाइल तयार करतात आणि पैसे मागतात.

🔹खोटा संदेश - तुमच्या खात्यात पैसे जमा झाले :

अनेक वेळा खोटा संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्या खात्यात काही रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचा फोन येतो आणि तो सांगतो की रक्कम चुकून ट्रान्सफर झाली आहे आणि तो अडचणीत आहे. उदा. हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणून कृपया ती रक्कम परत ट्रान्सफर करा. अशा परिस्थितीत अनेकदा व्यक्ती फसवणुकीच्या जाळ्यात अडकते आणि फसवणूक करणाऱ्याला तुमच्या बँक खात्यावरील पैसे ट्रान्सफर होतात.

🔹शेअर मार्केट / बनावट स्टॉक टिप्स आणि सल्ले :

शेअर बाजारात जलद नफा कमावण्याच्या आमिषाने अनेकदा फसवणुकीचे प्रकार होत असतात. बनावट गुंतवणूक तज्ज्ञ, अनधिकृत ट्रेडिंग सल्लागार आणि फसवे प्लॅटफॉर्म लोकांना मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करतात.

🔹टास्क फसवणूक :

टास्क फसवणूक म्हणजे फोनवरील कॉलर्स आपल्याला विविध कामे करायला सांगतात आणि त्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन देतात. सुरुवातीला कॉलर खूप आकर्षक ऑफर देतात. परंतु काही वेळातच ते विविध कारणांसाठी पैसे मागू लागतात. आपल्याला विश्वासात घेतल्यावर कॉलर्स मोठ्या प्रमाणात पैसे मागण्यासाठी फसवतात. अशा प्रकारे आपण अनेक वेळा आपले पैसे गमावतो आणि आपली फसवणूक झाली हे आपल्याला समजतही नाही.

🔹सायबर फसवणूक झाल्यास : DIAL 1930